समभाव, संवेग, निर्वेद, अनुकंपा, आस्था आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप हे मोक्षाचे सहा मार्ग आहेत. साधू, श्रावक आणि श्राविकांनी या सहा गोष्टींचे आचरण करावे. उत्तराध्यायन सुत्राच्या ३६ व्या अध्यायाच्या गाथेचा आधार घेत अंतिम श्वासापर्यंत जिनवाणी, वचन ऐकतो व त्यावर भावपूर्ण आचरण करतो तो निर्मळ असतो. समत्वदर्शी, सम्यकत्वदर्शी आणि समस्तदर्शी हे तीन प्रकार सांगत राग, द्वेष यांना आपल्या जीवनात स्थान देऊ नये असे आवाहन प.पू. सुमित मुनिजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून केले.
इतरांच्याप्रती समभाव ठेवणे कठीण असते पण हा समभाव ठेवल्याने काय लाभ होतात महाभारातील दमदन राजा जे ऋषी बनलेले असतात. त्यांना पाहून कौरव पांडवांनी त्यांच्याशी चांगले वाईट वर्तन केले परंतु त्या दोहोंच्या वागण्याबद्दल दमदन साधकाने ना द्वेष, ना राग व्यक्त केला. त्यांच्या मनात समभाव होता. राग आणि द्वेष हेच कर्मबीज ठरतात. संवेग ही संकल्पना सांगताना भविजीव व अभविजीव या विषयी प्रकाशझोत टाकला. निर्वेदभाव, अनुकंपा, आस्था आणि सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप याबाबत माहिती दिली. जिनवाणी फक्त चातुर्मासापुरती ऐकावी, त्यानुसार आचरण करावे असे नाही. आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत जिनवाणीत सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचे पालन करत जीवन जगण्यात मजा आहे. तर परमपुज्य ऋजुप्रज्ञ मुनिजी महाराज साहेब यांनी उत्तराध्यायनातील अध्यायाच्या संक्षेपाने सांगण्याच्या शृंखलेत आज ३५ व्या अध्यायात साधुने काय करावे आणि काय करावे याची आचारसंहिता सांगितलेली आहे त्यावर चर्चा केली. आतील भाव परिवर्तन केले तर आत्मकल्याण होईल त्यामुळे भाव परिवर्तन करण्याबाबतचे आवाहन त्यांनी केले.