मुंबई (वृत्तसंस्था) – लोणी काळभोर -उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेली भांडणे सोडविणाऱ्या पोलिसाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचारी सोमनाथ शिवाजी चितारे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शुभम उर्फ दाद्या अशोक कानकाटे (रा. कोरेगाव मूळ, इनामदारवस्ती, ता. हवेली) व अजय रामचंद्र ठवरे (रा. उरूळी कांचन) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
25 मे रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, हवालदार एस. ए. पवार, सोमनाथ चितारे, ए. एम. भोसले हे उरूळी कांचन पोलीस चौकीत असताना त्यांना तळवडी चौकामध्ये भांडणे सुरू असून निलेश दत्तात्रय भोसुरे (वय 27, रा. धानोरे, ता. शिरूर) याला मारहाण होत असल्याचे समजल्याने पोलीस पथक तेथे पोहोचले.
येथे शुभम कानकाटे, अजय ठवरे व इतर 7 ते 8 जण मारहाण करत होते. पोलीस भांडण सोडवू लागले. त्यावेळी कानकाटे, ठवरे व त्यांचे साथीदार हे चितारे यांच्या अंगावर धावून आले, त्यांना मारहाण केली. आमचे नादी लागला तर आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. तुमचा मर्डर करीन अशी धमकी दिली.