आपल्या आई वडिलांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्या उपकाराची फेड तर करता येण्यासारखी नाही त्यांची सेवा करून, त्यांना सन्मानाने वागवून त्यांच्याप्रती मनात कृतज्ञता ठेवावी. अशी भावनीक साद शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात घातली. माझ्यासाठी जन्मदाते देव रुपात आहेत. मी माझ्या आई-वडिलांना दुःखी करणार नाही, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येणार नाही याची काळजी घेऊ असा संकल्प प्रत्येकांने घ्यावा असे सांगून या भावनाप्रधान विषयावरील प्रवचनामुळे उपस्थित श्रावक-श्राविका भावविभोर झाले.
आपल्या जीवनात माता-पित्यांचे स्थान अतुलनीय आहे. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवायला हवी. आजच्या परिस्थितीत मुलाने वृद्ध माता पित्यांचे पालन, पोषण करणे कर्तव्य आहे. परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात रवाना केले जाते. मुलं मोठ्या गर्वाने इतरांना सांगतात की आई-वडिल माझ्याकडे राहतात. परंतु मी आई-वडिलांसोबत राहतो अशी भावना मुलांनी का ठेऊ नये? असे सांगून माता-पित्याची महती सांगणाऱ्या गिताचा संदर्भ घेतला.
‘मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया, ओ मात पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हे पाया।। मैं जब से जग में आया, बने तब से ही तले छाया, कभी सहलाया गोदी में कभी कांधे पर है बिठाया, मेरे सिर पर हाथ रख कर बस प्यार ही प्यार लुटाया। ह्या गीताचे सामूहिक गायन झाले. परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उत्तराध्यायन सुत्रच्या ३४ व्या अध्यायाचा गोषवारा सांगितला. या अध्यायातील गाथा व त्यापासून काय प्रेरणा घ्यावी याबाबत सांगितले.