परमेश्वराकडून आपल्या टाईम बँकेच्या अकौंटमध्ये दररोज ८६, ४०० सेकंद जमा होत असतात. मिळालेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे असे समजून जो वेळेचा सदुपयोग करतो तो खरा स्मार्ट ठरतो. आपल्याला या जन्मी मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग प्रत्येकाने करावा असे मार्गदर्शक विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.
जगातला अत्यंत श्रीमंत अथावा अत्यंत कफल्लक व्यक्ती असो त्यांना ईश्वराकडून दिवसाचे २४ तास मिळालेले असतात. कुणी मिळालेला वेळ व्यर्थ वाया घालवितो तर कुणी त्या वेळेचा पुरेपूर चांगला उपयोग करून घेतात. येथे जन्मलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या भाग्यानुसार अथवा पुण्य प्रभावामुळे म्हणा सत्ता, संपत्ती आणि सौदर्य कमी जास्त प्रमाणात मिळते. ही व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून त्याला २४ तासांपेक्षा अधिक वेळ मिळाला आहे असे होत नाही. परंतु श्रीमंत वा यशस्वी व्यक्ती मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा चांगला उपयोग करून घेतात. पूर्वी आठवड्यातून सुट्टीला एखाद्या वेळी थिएटरमध्ये तीन तास चित्रपट बघायला खर्च होत असत आता तर मोबाईल, ओटीटी यामुळे हवे तिथे, हवे तेव्हा चित्रपट बघता येतात. टिव्ही, मोबाईलमुळे तर सगळ्यांचाच वेळ वाया जात आहे. ध्यानात ठेवले पाहिजे की, प्रत्येक क्षण आपण मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मृत्यू येण्या आधी तुम्ही स्वतःला सावरा आणि मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्या असे आवाहन महाराज साहेबांनी आजच्या प्रवचनात केले. या प्रवचना आधी परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उपस्थितांशी प्रवचनाच्या माध्यमातून संवाद साधला.