निवडणुकीत खडसे घराणे पुन्हा चर्चेत, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही नणंद-भावजय विरोधात
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांना तिकीट मिळाले आहे. पाटील व खडसे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. लोकसभेनंतर आता विधानसभेतही रोहिणी खडसे विरुद्ध रक्षा खडसे दिसणार असून निवडणुकीत खडसे घराणे पुन्हा चर्चेत आले आहेत.
आमदार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी आव्हान दिले आहे. आपण पक्ष आदेश पळून महायुतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांचा प्रचार करणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे.(केपीएन)आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. तरी मी भाजपाची कार्यकर्ता असल्याने महायुती म्हणून मी त्यांचा प्रचार करणार असल्याचे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
महायुतीत होणारी बंडखोरी रोखण्यासाठी ना. गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. या बंडखोरीसंदर्भांत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा प्रचार केला होता.(केपीएन) त्यांच्या विरोधात मंत्री रक्षा खडसे उमेदवार होते. त्या विजयी होऊन त्यांना मंत्रिपद देखील मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघी आपापल्या पक्षाचे काम करु असेही रक्षा खडसे म्हणाल्या.
रोहिणी खडसे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवितांना तुतारी चिन्हावरून प्रचंड मतांनी विजय संपादन करतील, असा विश्वास मुलीच्या विजयाबाबत जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.(केपीएन)मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांच बालेकिल्ला मानला जातो. परंतु, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांना पराभूत केले होते. पाच वर्षानंतर मैदानात पुन्हा हीच लढत मुक्ताईनगर-बोदवडवासियांना पाहायला मिळत आहे.