शस्त्रक्रियेने वाचविले शिशुचे प्राण ; एनआयसीयुचाही सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) :- निमखेडी सारोळा येथील नवजात शिशुच्या नाभीतून बाहेर आलेल्या आतडे शस्त्रक्रियेद्वारे पोटात रचण्यात आले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांच्यासह नवजात शिशु विभागाच्या उपचारामुळे शिशुचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी सारोळा येथील किसन पवार हे मोलमजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्या सुखी संसारात मुलाच्या रूपाने फुल उमलले. त्यांच्या पत्नीची मुक्ताईनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाल्यानंतर जन्मलेल्या शिशुच्या नाभीतून आतडे बाहेर आले होते. यावेळी स्थानिक डॉक्टरांनी त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यांनी तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालय गाठले. याठिकाणी किसन पवार यांनी त्यांच्या शिशुला उपचारासाठी भरती केले. बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी यांनी शिशुची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिशुवर डॉ. मिलींद जोशी यांनी शस्त्रक्रिया करून बाहेर आलेले आतडे पोटात रचले. शिशुचे वजन कमी असल्याने त्यास नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीवार यांनी तातडीने शिशुवर उपचार सुरू केले. सुरवातीचे काही दिवस श्वास घ्यायला त्रास होत असल्याने शिशुला व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार सुरू ठेवण्यात आले. उपचारामुळे शिशुच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला झालेल्या जंतुसंसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आले. शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे शिशुची प्रकृती धोक्याबाहेर येऊन त्याचे प्राण वाचले. शिशुचे प्राण वाचल्याने किसन पवार यांच्या कुटूंबातील आनंद हा गगनात मावेनासा झाला. उपचारासाठी बालरोग तज्ज्ञ डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, हिरामण लांडगे यांनी सहकार्य केले.