व्यक्तीगत, धार्मिक वा सार्वजनिक जीवनात समस्या तर येणारच, या समस्यांचा अधिक बाऊ करण्यापेक्षा त्यांच्याशी ध्यैर्याने दोन हात करून त्यावर मात मिळविण्यात खरा पुरुषार्थ आहे. आमग शास्त्रामध्ये देखील हेच सांगण्यात आलेले आहे. समस्या आल्या तर त्या कायम राहत नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. समस्यांसाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. त्या समस्यांपासून दूर पळून जा म्हणजेच समस्यासे ‘भाग लो’! किंवा या समस्येवर विजय मिळविण्यासाठी दोन हात करा म्हणजे समस्या में ‘भाग लो’ या दोन्ही पर्यायापैकी तुम्हाला जो योग्य वाटतो तो मार्ग पत्करावा असे मोलाचे मार्गदर्शन शासनदीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून केले.
साधनेचा मार्ग असो वा गृहस्थ जीवन यामध्ये प्रतिकूलता, कठीण परिस्थिती वा समस्या तर निर्माण होणारच. ज्याप्रमाणे कठीण चढ असेल व बैल म्हातारा असेल तर तो त्या चढावाकडे पाहिल्यावर नाराज होतो त्याच प्रमाणे काही व्यक्तींचे असते, समस्या आल्या म्हणजे ते घाबरतात, त्यापासून पळायचे बघतात. या समस्यांचा सामना करायला हवा. आपल्याला नेहमीच समस्या येतात त्यावर उपाय शोधण्यासाठी एका साधूकडे एक युवक जातो. साधु म्हणाले मी तुला उपाय सांगतो पण माझ्याकडे १६ उंट आहेत, त्यांना रात्रभर सांभाळ ते झोपल्यावर तू झोप. १६ उंट काही झोपले नाही. एक उठत असे तर दुसरा असे करत रात्रभर उंटांची उठबस सुरू होती. सकाळी पुन्हा साधुकडे तो युवक गेला. त्यावर साधु म्हणाले अरे बाबा आपल्या समस्यांचेही असेच असते. एक संपली की दुसरी येत असते त्यामुळे त्याला सामोरे जायचे हेच योग्य.
आपले आध्यात्मिक आरोग्य चांगले राखणे म्हणजे आत्म्याला स्वस्थ ठेवणे होय. आत्मा निरोगी ठेवण्यासाठी तत्त्वानुप्रेक्षा, सामुहीक साधना व स्वाध्याय, जीवन नियमन, मैत्री भाव वाढविणे, विवाद विग्रह या पासून दूर राहणे, आत्मानुशासन, इंद्रीय निग्रह, छिद्रान्वेषणचा त्याग, गुणपरख दृष्टी हे ९ बिंदू, १२ व्रत आणि १४ नियम सांगण्यात आलेले आहेत. या गोष्टींचा अवलंब करून आध्यात्मिक आरोग्यवान बनावे असा मोलाचा संदेश परमपुज्य ऋजुप्रज्ञ मुनि जी महाराज साहेब यांनी उपस्थितांना दिला.