दुसऱ्यांसाठी व स्वतःसाठी सुख, शांतीची अनुभूती घ्यायची असेल तर दुसऱ्यांना नव्हे तर आधी स्वतःच्या स्वभावात बदल करणे आवश्यक आहे. भगवान महावीर स्वामी यांना शिष्य गौतम स्वामी यांनी प्रश्न विचारला की जीव गुणांच्या वृद्धी कशा प्राप्त करू शकतो. याबाबत आगममध्ये सांगण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण विषयावर शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी प्रवचनात विचार व्यक्त केले.
उदाहरण पटवून देताना चंद्राचे उदाहरण देण्यात आले. पौर्णिमा ते अमावस्या या दरम्यान चंद्राचे कमी कमी होत अमावस्येला चंद्र आकाशात न दिसणे हा प्रकार म्हणजे गुणांचा ऱ्हास म्हणायला हवा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हळूहळू चंद्राचे पूर्णत्व होणे म्हणजे गुणांची वृद्धी होणे होय. आपल्या गुणांमध्ये वृद्धी होण्यासाठी आपण काय करायला हवे याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन प्रवचनाच्या माध्यमातून श्रावक – श्राविकांना करण्यात आले. भाव, स्वभाव आणि प्रभाव या संकल्पना देखील उत्तमरित्या स्पष्ट करून सांगितल्या. स्वभाव चांगला व दिसण्यात न्युनता, परिस्थितीने गरीब असेल तरी ती व्यक्ती हवीशी वाटते. पुरुषाचे फुलासारखे आणि काट्यासारखे असणे असे दोन प्रकार असतात. स्वभाव वाईट असेल व व्यक्ती कितीही सुंदर असेल तरी त्यापासून दूर राहणे बरे असा विचार लोक करतात. त्यामुळे गुणांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.
सम्यक ज्ञान, सम्यक दर्शनन, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप या चार गोष्टींमुळे परिपूर्ण स्थिती प्राप्त करण्याचे साधन आहे. या चार उपासनेने मोक्ष प्राप्त होतो. जैन धर्मानुसार या रत्नांच्या मार्गानेच आत्म्याची शुद्धी आणि मुक्ती होते. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष या नऊ तत्त्वांचे सार जाणून घ्या. आपण आगमातील ओव्या (थोकडे) पाठ करतो, वाचन करतो परंतु त्याचा सार जाणून घेत नाहीत. आत्मशक्ती जागृत करायची असेल तर आधी स्वतः स्वतःला ओळखून घ्यावे त्यातून आत्मकल्याण होईल याबाबत परमपुज्य ऋजुप्रज्ञ मुनिजी महाराज साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.