ज्या प्रमाणे नाग आपली कात टाकतो त्यानंतर तो नाग टाकलेल्या कात कडे वळून बघत नाही त्याच प्रमाणे आपल्या ममत्वाबद्दल असायला हवे. खरे तर ममत्व भाव सर्व दुःखाचे कारण ठरते. दुसऱ्याचा महागडा नवा बुट चोरीस गेला तर त्याचं आपल्याला फासं दुःख होत नाही मात्र तोच बुट जर आपल्या मालकीचा असेल तर आपल्याला त्याचं खूप दुःख होते. आजच्या प्रचनाची गुंफण करताना मेगापुत्र व त्यांच्या मातेच्या दरम्यान झालेला संवाद, त्याच प्रमाणे राजा शालीभद्र ज्यांच्या ३२ राण्या, राज्य, प्रजा हे सर्व सोडून त्यांच्यात वैराग्य भाव जागृत झालेला असतो, त्याची बहीण सुभद्रा आणि धन्ना यांच्या विषयी शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज यांनी केली.
उत्तराध्यायन सुत्राच्या १९ व्या अध्यायाची गाथा त्यांनी स्पष्टीकरणासाठी घेतली होती. जन, धन, पत्नी, पुत्र, सत्ता हे सर्व सोडून संन्यास घेण्यासाठी खूप मोठे ध्यैर्य लागते. या सगळ्या गोष्टींमध्ये आसक्त राहू नका. स्वतःचे नाथ बनावे असे आवाहन उपस्थित श्रावक-श्राविकांना करण्यात आले. यावेळी परमपुज्य ऋजुप्रज्ञजी मुनिजी महाराज साहेब यांनी भांडण होण्याचे कारणे व त्यावर उपाय सांगितले. आज एखाद्या शहरातील संघामध्ये वाद होताना दिसतो संघामध्ये वाद निर्माण होऊ नयेत याकडे लक्ष द्यायला हवे. चूक सांगणारा हा उपकारी असतो. एकवेळ शस्त्राने शरीरावर झालेली जखम भरून निघते पण वाणीने झालेली मनातील जखम भरून निघू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीची सतत तक्रार करणे आणि उलट उत्तर देणे हे भांडणाचे कारण ठरतात. त्या गोष्टी टाळून शांततामय जीवन जगणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.