रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतोय लाभ
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्रौत्सवसाठी व प्रत्येक घराघरातील देवपुजेसाठी बोथे केळांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून १५० ते २०० रुपये डझनने विक्री केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.
संपुर्ण नऊ दिवस देवी देवतांची पूजन करून प्रसाद म्हणून या केळीचा वापर केला जातो. रावेर, यावल, मुक्ताईनगर ही तालुके जिल्ह्यातील केळीचे आगार म्हणून ओळखले जात असले तरी यामध्ये सुद्धा ही केळी लागवड केली जात नाही. पूर्वीपासून काही केळीची पारंपारिक जाती आहेत. त्यातीलच ही जात आहे.
राय केळ, बोथे केळ, रानकेळ, हर्दापुरी केळ, हरसाल केळ, वसई केळ, लाल केळ इत्यादी प्रमुख जाती आहेत. मात्र आजच्या या संकरीत बियाण्यांच्या युगात काळाच्या पडद्याआड होण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील चिनावल व न्हावी, कुंभारखेडा खिर्डी, विवरा या गावातीलच जुने शेतकरी या केळीची लागवड करतांना प्रामुख्याने दिसून येतात. अतिशय पवित्र समल्या जाणाऱ्या या बोथे केळीची देव पुजेसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे. मिळेल त्या दराने मोठ्या श्रध्देने भाविक खरेदी करतांना दिसून येत आहेत.