जिल्हापेठ पोलिसांकडून एकाला अटक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आर.आर. विद्यालयाच्या परिसरात एका बुलेटवर आलेल्या तरुणाजवळ तब्बल ४८ हजार ५०० रुपये किमतीच्या पाचशेच्या ९७ नोटा नकली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हापेठ पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून याप्रकरणी बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन शांताराम सावकारे (वय-२७, रा, पुण्यनगर, यावल) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयाच्या शेजारील असलेल्या गल्लीत संशयित आरोपी चेतन सावकारी हा बुलेट क्रमांक एमएच सीएल २२२१ वर आलेला होता.(केसीएन)त्यावेळी त्याच्याकडे पाचशेच्या बनावट नोटा असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी चेतन सावकारे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या ९७ नोटा असा एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार मिलिंद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चेतन सावकारे याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.