एरंडोल शहरात एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल आणि कासोदा शेत शिवारातील पाच ठिकाणी इलेक्ट्रिक पोलवरील तारची चोरी करणारी टोळीचा पर्दाफाश जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या प्रकरणात ३ जणांना एरंडोल शहरातून मंगळवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले इलेक्ट्रिक तारांचे बंडल जप्त करण्यात आले आहे.
एरंडोल आणि कासोदा शेत शिवारातील परिसरातून महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक पोलवरील तार कारची चोरी केल्याप्रकरणी एरंडोल आणि कासोदा पोलीस ठाण्यात एकूण वेगवेगळे पाच गुन्हे दाखल होते. तारांचे चोरी करणारे संशयित आरोपी हे एरंडोल शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघडकिला आणण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता एरंडोल शहरात जाऊन कारवाई केली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी रवींद्र अनिल मिस्तरी (वय-३८), धनराज प्रकाश ठाकूर (वय-४६), समाधान नारायण पाटील (वय-४५ सर्व रा. एरंडोल) या तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्यातील ३ आणि कासोदा पोलीस ठाण्यातील १ असे ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक विद्युत तार जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी अटकेतील संशयित आरोपींना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.