जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला पैसा आवश्यक आहे. जीवननिर्वाहासाठी अर्थार्जन हे न्याय, नीती आणि धर्मानुकूल असावे. त्यासाठी आगमामध्ये मार्गदर्शन केलेले आहे. धन कमावताना पाच गोष्टींचे पथ्य सांगण्यात आलेले आहे, त्यामध्ये परमार्थ धन, घामाची कमाई, उदारता, लज्जा आणि भाव सरलता या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करावा असे अत्यंत प्रभावी विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवनातून मांडले.
असे म्हणतात की, नितीने कमावलेल्या धनाला बरकत असते. एरंडाचे झाड कमी काळात फोफावते त्याला फळं लागतात त्याचे आयुष्य कमी असते, परंतु वडाचे झाड वाढायला खूप वर्षे लागतात. वडाचे झाड हे अधिक वर्षे टिकते. पापाची, अनितीची कमाई ही एरंडाचे झाड समजा व नितीने, धर्मानुकुलतेने कमावलेले धन हे दीर्घकाळ टिकणारे असते. आपल्या मुलांना किंवा पुढच्या पिढीला दिलेली छोटी सवलत मारक ठरू शकते. त्यासाठी इराणच्या राजाची गोष्ट सांगितली. जंगलात जाताना स्वयंपाकी मीठ नेण्याचे विसरला. जंगलात मीठ कोण देणार? सैनिकांनी एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीकडून आणले. त्यात भोजनाला उशीर झाला. राजाला मीठ कोणी दिले आणि त्याला त्या मीठाचे मूल्य चुकविले की नाही? असे विचारले… मीठ क्षुल्लक गोष्ट आहे त्याचे काय मूल्य चुकवायचे. परंतु राजाने मिठाचे मूल्य चुकविल्याशिवाय कुणीच भोजन करायचे नाही असे सांगितले. ही छोटी गोष्ट असली तरी सवयीने पुढे मोठी होते याबाबत सांगितले. परमपुज्य भुतीप्रज्ञ महाराज साहेब यांनी आठ स्वप्नांचे विवेचन करत असताना भगवंताने सांगितलेल्या मार्गानुसार चालावे, सुयोग्य साधू, साध्वी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार धर्माचरण करावे याबाबतचा संदेश दिला.