भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील राजस्थान मार्बलजवळील हॉटेल सुरूची मागील विहिरीत ६० ते ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
राहुल दीपक जाधव (३३. गोकुळ नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार, अनोळखी ६० ते ६५ वर्षीय वृद्धाचा हॉटेल सुरूचीमागील विहिरीतील पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. मयताने आत्महत्या केली की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला तसेच मयत नेमका कोण व कुठला रहिवासी ? याबाबत अद्याप ओळख पटलेली नाही. बाजारपेठ पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी हलवला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.