जळगावमधील सेंट्रल बँकजवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- बँकेतून पगार काढल्यानंतर पासबुक प्रिंट करण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या रेखाबाई बापू गायकवाड (वय ४०, रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या पर्समधून ८ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना शहरातील सेंट्रल बँकेजवळील एटीएमजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीतील रेखाबाई बापू गायकवाड (वय ४०) या सिव्हील हॉस्पिटल येथील कॅन्टीनमध्ये स्वयंपाकाचे काम करतात. दि. १९ सप्टेंबर रोजी त्यांचा पगार झाल्याने त्या दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील सेंट्रल बँकेत गेल्या होत्या. बँकेतून पगार काढल्यानंतर त्या पासबुकमध्ये एन्ट्री करण्यासाठी बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएमजवळील सीडीएम मशिनजवळील रगित उभ्या राहिल्या. याचवेळी त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने पगाराची काढलेली रक्कम लांबवली.
पासबुक प्रिंट केल्यानंतर रेखाबाई गायकवाड या कॅन्टीनमध्ये कामासाठी आल्या. त्यावेळी त्यांना पर्समधून कोणतरी अज्ञात चोरट्याने पैसे चोरुन नेल्याचे समजले. त्यांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बँकेत जावून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये दोन महिला गायकवाड यांच्या पर्समधून पैसे काढतांना कैद झाल्या आहेत. दरम्यान, गायकवाड यांनी मंगळवारी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.