स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिकांचा विरोध
ठाणे (वृत्तसेवा) : बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला. बदलापुरातील स्मशानभूमीत अक्षयवर अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. शिंदेच्या कुटुंबाने मृतदेहाचे दहन न करता तो पुरण्याचा निर्णय घेतला आहे.
अक्षयच्या वडिलांचे वकील अॅड. अमित कटारनवरे यांनी स्पष्ट केले की, “पुरावे नष्ट होऊ नये म्हणून अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन करणार नाही, तर पुरणार आहोत. भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल.” आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करुन ठेवू म्हणून आम्ही दहन करणार नाही तर पुरणार आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी कोर्टात केल्यानंतर सरकारी वकिलांनी न्यायालयात आश्वासन दिले आहे की, मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी स्थानिक प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून दिली जाईल.
तथापि, स्थानिक नागरिकांचा ठाम पवित्रा आहे अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला मान्जर्ली स्मशानभूमीत स्थान मिळणार नाही. मात्र, अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करू शकत नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली असून, काहींनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.पोलीस स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेत आहेत, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.