तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्गत जळगाव जिल्ह्यातून निवड झालेल्या यात्रेकरूंची अयोध्येसाठी भुसावळ स्टेशन वरून दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत अयोध्येसाठी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे. सदर योजनेतंर्गत जळगाव जिल्हयातील इच्छूक ज्येष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठया प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. सदर अर्जांची छाननी करुन ७९६ लाभार्थी व १२ सहायक यांची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना समन्वय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत निवड करून शासनास शिफारस करण्यात आली होती.
त्यानुसार जळगाव येथून तीर्थदर्शनासाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेला परवानगी मिळाली असून दि. ३० रोजी, सकाळी ९ वाजता विशेष रेल्वे जळगाव रेल्वे स्थानकावरुन श्रीराम मंदिर अयोध्या येथे तीर्थदर्शनासाठी रवाना होणार आहे.तीर्थयात्रेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, सहायक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय जळगाव व जिल्हयातील सर्व तालुक्यांचे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व नगरपालिका/नगरपरिषद कार्यालये येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.