इतरांना आनंदी पाहून ज्याला ईर्ष्या/मत्सर होतो, त्या व्यक्ती कधीही सुख-शांतीचा अनुभव घेऊ शकत नाहीत. खरे तर गुणांना नष्ट करणाऱ्या, क्रोध, ईर्ष्या, कृतघ्नता आणि मिथ्या आग्रह या गोष्टी आहेत. या ४ गोष्टींपासून प्रत्येकाने दूरच रहायला हवे. या पूर्वीच्या प्रवचनांमध्ये क्रोध या विषयावर बरेच सांगण्यात आले आहे. दुसऱ्या विषयी मनात ईर्ष्या बाळगली तर ती व्यक्ती जळत असते त्यामुळे सुखी समाधानी राहण्याकरीता ती अडसर ठरते. आपल्या मनातून ईर्षा हद्दपार करावी असे आवाहन शासनदीपक परमपुज्य सुमित मुनीजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून केले.
विहार करत असताना एका ट्रकच्या मागे एक मार्मिक वाक्य वाचण्यात आले, ‘मेरी चलती है तो तेरी क्यो जलती है!’ दुसऱ्याची प्रगती होताना, दुसऱ्याची प्रशंसा होत असेल तर आपल्या मनात त्याच्याप्रती ईर्ष्या निर्माण होते. लहानपणी एकाकडे खेळणे असते व दुसऱ्याला देखील तेच खेळणे हवे असते. काही केल्या आपले खेळणे तो देत नाही. दुसरा ते खेळणेच तोडून टाकतो. मला नाही तर त्यालाही नाही. येथून ईर्ष्या निर्माण होते ती थेट सरणावर जाईपर्यंत सोबत असते. क्रोध व अभिमान या कषाय मुळे ईर्षा निर्माण होते याबाबत राजस्थानमध्ये घडलेली सत्यकथा त्यांनी उपस्थितांना सांगितली. स्वतःच्या दुःखात आणि दुसऱ्याच्या सुखात आपल्याला आनंदी राहता आली पाहिजे त्यासाठी ईर्ष्या सोडण्याचे आवाहन परमपुज्य महाराज साहेबांनी केले.
आपल्यामध्ये सम्यकत्व मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. आत्मकल्याणाचा ध्यास घ्यायला हवा, मिथ्यत्व सोडायला हवे याबाबत परमपुज्य भुतीप्रज्ञ महाराज साहेब यांनी प्रवचनात सांगितले.