प्रत्याख्यान केल्याने काय होते? असा प्रश्न विचारला असता दोन गोष्टी होत असतात. पहिली म्हणजे इच्छांना प्रतिबंध बसतो आणि आश्रवद्वार बंद होतात. १) मिथ्या विश्वास (मिथ्यात्व), २) अविरति, ३) कषाय, ४) प्रमाद, ५) मनो-शारीरिक गतिविधियाँ (योग) यामुळे कर्मबंध होतात. याबाबतची चर्चा आजच्या प्रवचनात केली. मुख्यत्वाने अविरती याबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यात आले. जैन शासनदीपक परमपुज्य सुमितमुनीजी महाराज साहेब यांनी उदाहरणे देऊन समजावून सांगितले.
सामान्यता जो करतो तो भरतो असे इतर दर्शन शास्त्रात सांगितले जाते परंतु जैन दर्शनशास्त्र यामध्ये यापेक्षाही सुधारीत विचार मांडलेला आहे, तो असा की, ‘जो नाही करत तो देखील भरतो’ म्हणजे तो व्रत आचारण करत नाही त्याला ‘अविरती’ म्हटले जाते. नियम हे खरे तर मानवाला दानव बनविण्यापासून वाचविते. मनाने काही तरी चांगले करण्याचा संकल्प करायला हवा या विषयी सांगताना खिडकीचे उदाहरण दिले. खिडकीला कडी लावली नाही तर बाहेरची हवा आत येते परंतु खिडकीला कडी लावणे म्हणजे कितीही जोरात हवा आली तरी ती खिडकी उघडणार नाही व बाहेरची हवा आत येणार नाही. कुठे तरी मर्यादा घालण्यासाठी प्रत्याख्यान अत्यंत महत्त्वाचे असतात. प्रत्याख्यान याकडे बंधन नव्हे तर सुरक्षा म्हणून बघायला हवे असे मार्गदर्शन प.पू. महाराज साहेबांनी केले.
कुणीही कुणाबाबत आपल्या मनात वैरभाव ठेऊ नये. वैराला वैराने उत्तर देऊ नये, असे केले गेले तर कर्मबंध बांधले जातात. त्याबाबतची रंजक कथा सांगण्यात आली. कर्मबंध कमी करण्यासाठी जास्तीतजास्त तपस्या करावी. तपस्या केल्याने कोणते फायदे होतात त्याबाबत ही सोदाहरण सांगण्यात आले.