धरणगाव तालुक्यातील पथराड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : विद्युत बोर्डाचे काम करीत असताना विजेचा धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पथराड येथे घडली आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.
समाधान भागवत पाटील (२९, रा. पथराड, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते जैन कंपनीत कामाला आहेत. समाधान यांचे पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. (केसीएन)समाधान पाटील हे रविवारी सकाळी पथराड येथे त्यांच्या घराच्या शेजारी एका मित्रासह विद्युत बोर्डाचे काम करीत होते. त्या वेळी त्यांना विजेचा जबर धक्का लागला. त्यात ते फेकले गेले.
ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. (केसीएन)घटनेबद्दल पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, समाधान याच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.