नांदेड(वृत्तसंस्था ) : पालघर साधू हत्या कांड प्रकरण ताजे असतानाच आता नांदेडमध्ये शिवाचार्य गुरु नागठणकरांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारेकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री ३ वाजता साधूंची हत्या केली. सोबतच यावेळी साधूंचा बचाव करणाऱ्या त्यांच्या अनुयायांनाही मारहाण झाली. महाराष्ट्र ज्याला संतांची भूमी अशी भली मोठी परंपरा लाभली आहे, त्याच देवभूमीत आता साधूंच्या हत्या होत असल्याने हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
नांदेडच्या उमरी तालुक्यातील नागठाणा गावात रविवारी मध्यरात्री साधू हत्याकांडाचा प्रकार घडला. हत्येनंतर मृतदेह सोबत नेण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला. मुख्य म्हणजे शिवाचार्य यांचे मारेकरी हे नागठाणे या गावातीलच असल्याची प्रार्थमिक माहिती समजते आहे. सदगुरु निर्वाण पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठणकर यांच्या नागठण येथील मठात दोन वाजताच्या सुमारास काही मारेकरी घुसले. सदगुरुंना मारहाण सुरू केली. या झटापटीत तिथल्या सेवकांनी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरही मारेकऱ्यांनी हल्ला केला.
हत्येनंतर मठातील अलंकार, रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. तसेच हत्येनंतर मृतदेह सोबत नेण्याचा प्रयत्न झाला. पसार होण्यासाठी महाराजांचीच कार नेण्याचा प्रयत्न झाला परंतू प्रवेशद्वार बंद असल्याने हा प्रयत्न फसला. दरम्यान, या घटनेत एका चोरट्याचाही मृत्यू झाल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. हे सर्वजण गावातीलच गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असल्याचे समजत आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने कट रचून ही हत्या करण्यात आल्याचे प्रार्थमिक माहितीवरून समजत आहे.
पालघरमध्येही अशा प्रकारे हिंसक जमावाकडून कट रचून साधूंची हत्या करण्यात आली होती. यात दोन साधू आणि त्यांचा चालक यांची जमावाने अमानुष हत्या केली. पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र जीला आपण संतांची भूमी म्हटली जाते त्या भूमीत असा किळसवाणा प्रकार घडल्याने याबद्दल देशभरातील हिंदूंनी शोक व्यक्त केला होता. पालघरच्या हत्याकांडानंतर सलग दुसरी घटना नांदेड जिल्ह्यात घडली. या घटनेतही कट रचून साधूंची कट रचून हत्या करण्यात आली आहे. सरकार आणि गृहखात्याच्या भूमीकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.