भुसावळ बस स्थानकाबाहेरील घटना, हल्लेखोराला अटक
जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ शहरामध्ये बसस्थानकाबाहेर उभे असलेल्या तरुणाला पैसे मागून माझ्यासोबत चल असा आग्रह दुसऱ्या तरुणाने धरला. मात्र मी तुझ्यासोबत येत नाही असे सांगितल्याचा राग आल्याने दुसऱ्या तरुणाने त्याच्या पोटावर लोखंडी धारदार पट्टी काढून पोटावर जोरात मारली. घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
सुनिता महेश कुशवाह (वय ४० वर्ष, रा. मेहंदीवाडा, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्या बऱ्हाणपूर येथे पती महेश, मुलगा रामकरण आणि मुलगी पूजा यांच्यासह राहतात. अनेक दिवसांपासून ते भुसावळ बस स्टँड परिसरात भुईमुगाच्या शेंगांची विक्री करून उदरनिर्वाह करीत आहेत. (केसीएन)दरम्यान आज बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचा परिवार बस स्टँड जवळील रिक्षा स्टॉपजवळ उभा होता. त्यावेळेला त्यांचा परिचित तरुण जय राजू शिंदे हा तेथे आला.
जय शिंदे याने सुनिता यांचा मुलगा रामकरण याला सांगितले की, मला सत्तर रुपये दे आणि माझ्यासोबत चल. मात्र, रामकरण याने, मी तुझ्यासोबत येत नाही असे सांगितले. त्याचा राग आल्याने जय शिंदे याने, तू माझ्यासोबत आला नाही तर मी तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. तसेच त्याच्या खिशातून फळ कापण्याची लोखंडी धारदार पट्टी काढली आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रामकरणच्या पोटावर जोरात मारली. यामुळे रामकरण हा रक्तबांबाळ होऊन कोसळला.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचा परिवार रामकरणला घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आले. तिथून पोलिसांनी मेमो दिल्याने ट्रॉमा सेंटर येथे प्रथमोपचार केले.(केसीएन)त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
फिर्याद दाखल झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर जय राजू शिंदे (रा. लालबाग बऱ्हाणपूर) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय शिंदे हा रेल्वेत सामान विक्री करण्याचे काम करतो. दरम्यान भुसावळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी हा प्राणघातक हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.