
सर्वधर्मीय संत महंतांची उपस्थिती
रावेर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय संत समिती एवं समन्वय चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने आयोजित व ग्लोबल महानुभाव संघाचे वतीने संयोजीत श्री चक्रधरस्वामी जयंतीनिमित्त गुजरात राज्यात कार्यक्रम घेण्यात आला.
गुजरात येथील भरूच या ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे जन्मस्थळ राजवाडा आहे. परकीय आक्रमणात धर्मविरोधी तत्त्वांचे अतिक्रमणामुळे महानुभाव पंथीयांच्या मुक्त पूजन विधीमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे, या स्थळाच्या मुक्ततेसाठी सनातन हिंदू धर्माचे साधकांनी एकत्रित यावे व याच्या संवैधानिक लढ्याचा आरंभ करावा या उद्देशाने सनातन हिंदू धर्माचे वाहक द्वारकापिठाचे शंकराचार्य यांचे सतशिष्य तसेच अखिल भारतीय संत समितीचे जिल्हा महामंत्री स्वामी मुक्तानंद यांचे व महानुभाव पंथाचे महात्मा सुदर्शन नागराज बाबा कपाटे यांचे पुढाकाराने अवतार दिनाचे औचित्य साधून चिंतन बैठकीचे स्वरूपातील अवतार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प.पू. स्वामी लोकेश आनंद, स्वामी राजराजेश्वर गिरी, हरि शरणदास बाकरोल धाम (सोखड़ा), मंगलदास महाराज – लाखा हनुमान मंदिर, पुनगाम, देवकिशोर दास स्वामी स्वामीनारायण मंदिर, रघुनंदन दास स्वामी- स्वामीनारायण मंदिर, भरुच, सोमदास बापू, राघवेंद्र दास स्वामी- राम जानकी आश्रम, झड़ेश्वर भरूच, श्रीजी स्वामी महाराज स्वामीनारायण मंदिर, हरितनय स्वामी, स्वामीनारायण मंदिर बाकरोल धाम (सोखड़ा), महंत विद्याधर बाबा कपाटे महानुभाव, नवसारी गुजरात, महंत गोपाळ शास्त्री वाईंदेशकर महानुभाव या हिंदु धर्माच्या विविध संत महंत मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित संत महंत यांचे हस्ते देवाचे पूजन करण्यात आले, या स्थळाबद्दल माहितीपट सर्वांना दाखवण्यात आला. अखिल भारतीय संत समिति राष्ट्रीय अध्यक्ष कुबेराचार्य अविचलदेवाचार्य महाराज यांचा वीडियो संदेश दाखवण्यात आला. या कार्याची उपयुक्तता व आवश्यकता याबद्दल उपस्थितांना महात्मा श्रीसुदर्शन नागराज बाबा कपाटे महानुभाव यांनी पंथाचे वतीने भूमिका मांडली. सर्वज्ञांचे सामाजिक कार्याबद्दल व्याख्याते श्रीमान वागमारे यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले. सर्व संतांचे उपस्थितीमध्ये या कार्यासाठी येणाऱ्या काळात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी जन्मस्थळ मुक्ती अभियान करिता सर्व हिंदू संत महंत आणि संघटनेच्या माध्यमातून एक समिती निर्माण करण्यात येईल, या कार्याचे कायदेशीर संचालन केल्या जाईल असे ठरले.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे आरती व पूजन करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी महाराष्ट्र येथून पू श्रीगोपाल शास्त्री वाईंदेशकर महानुभाव यांची शिष्यांसह व नवसारी येथील महानुभाव आश्रमाचे संचालक महंत श्रीविद्यासागर बाबा कपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुरत, अंकलेश्वर, भरूच येथील भाविक वर्ग मोठ्या प्रमाणत उपस्थित होता .









