जिल्ह्यात सावदा ते पिंपरूळदरम्यान झाला होता भीषण अपघात
जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले वैद्यकीय प्रतिनिधी कुलदीपसिंह सुभाष पाटील (३२, रा. द्वारकानगर) यांचा उपचार सुरू असताना शुक्रवारी दि. ६ रोजी सकाळी मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांपासून गंभीर अवस्थेत सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
मूळचे अमळनेर तालुक्यातील चांदणी कुन्हे येथील रहिवासी असलेले कुलदीपसिंह पाटील हे सध्या जळगाव शहरातील द्वारकानगर परिसरात आई वडील, पत्नी व चिमुकल्या मुलीसह राहत होते. कुलदीपसिंह पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई- वडील, पत्नी, आठ महिन्यांची मुलगी आहे. या चिमुकलीचे पितृछत्र व तीन बहिणींचा एकुलता एक भाऊदेखील या घटनेने हिरावला आहे.
औषधी कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी असलेले पाटील हे २८ ऑगस्ट रोजी कामावर असताना सावदा ते पिंपरूड दरम्यान त्यांच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने धडक दिली होती. यात त्यांच्या हात-पायाचे हाड मोडण्यासह मोठी दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला व त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. अत्यंत मनमिळावू व होतकरू तरुणाच्या मृत्यूमुळे जळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.