यावल तालुक्यातील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील तरुणीची सोशल नेटवर्कवर उत्तर प्रदेशातील तरुणासोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत या तरुणाने थेट उत्तर प्रदेशातून तरुणीचे गाव गाठले. तेथे तरूण व त्याच्यासोबत आलेल्या तरूणांनी तरूणीच्या कटुंबाशी वाद घातले. ही माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी चोप देत त्यांच्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावल तालुक्यातील एका गावातील तरुणीची उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या तरूणाने आपल्या काही तरुण मित्रांना घेऊन थेट तरूणीचे गाव गाठले. त्यानंतर तिच्या कुटुंबाशी वाद घातला. ही बाब गावातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी या चौघांचा चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, सोशल नेटवर्कच्या माध्यमातून गावातील एका तरुणीची उत्तर प्रदेशातील जौनपुर जिल्ह्यातील सहागंज तालुक्यातील जरनापुर टपरी येथील राहणाऱ्या शिवम रवींद्रकुमार आस्थाना (वय २६) या तरूणाशी ओळख झाली. ओळखीनंतर ते सोशल नेटवर्कवर एकमेकांशी बोलू लागले.यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शिवम आस्थाना हा त्याचे तीन मित्रांना घेऊन शनिवारी थेट त्या तरूणीच्या गावात आला.
त्यानंतर ते तरुणीच्या घरीच पोहोचले. तर सोशल नेटवर्कवरून ओळख झालेल्या त्या तरुणाला पाहून तरुणी आवाकच झाली. या चौघांनी त्या तरुणीसह तिच्या आईशी वाद घालायला सुरुवात केली. अनोळखी मुले काय वाद घालत आहेत, हे पाहून गावातील नागरिकांची गर्दी जमली. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर या चौघांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला व नंतर त्यांना यावल पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात तरुणीच्या आईने उत्तर प्रदेशातील तरुणांविरुद्ध तक्रार दिली आहे.