जळगाव तालुक्यातील पिलखेडा शिवारातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार शेतात रस्ता तयार करण्याचे काम सुरु असतांना शेजारच्या शेत मालकासह पाच जणांनी रस्ता तयार करण्याचे काम बंद पाडले. तसेच निर्मलाबाई शांताराम कोळी (साळुंखे) (वय ६०, रा. पिलखेडा, ता. जळगाव) यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास पिलखेडा शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील निर्मलाबाई कोळी यांचे गावालगत शेत आहे. त्यांच्या शेजारीच एकनाथ शिवराम चोधरी यांचे शेत आहे. दि. ३० रोजी एकनाथ चौधरी यांच्या मालकीच्या शेतगटाला लागून तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार कोळी हे शेतात जाण्यासाठी रस्ता बनवित होते. दरम्यान, याठिकाणी एकनाथ शिवराम चौधरी, सुधाकर सिताराम चौधरी, कुणाल सुधाकर चौधरी, महेंद्र प्रभाकर चौधरी, जितेंद्र प्रभाकर चौधरी, अतुल एकनाथ चौधरी (सर्व रा. पिलखेडा, ता. जळगाव) हे त्याठिकाणी आले.
त्यांनी जेसीबी मशिन अडवून रस्ता तयार करण्यास अडथळा निर्माण केला. तसेच कोळी यांना शिवीगाळ करीत दमदाटी करु लागले. यावेळी महेंद्र चौधरी याने त्याच्या हातातील दांडक्याने वृद्ध महिलेला मारहाण करुन गंभीर जखमी केले. दरम्यान, महिलेने तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहेत.