बोदवड शहरातील घटना
बोदवड (प्रतिनिधी) : पक्षाघाताच्या आजाराला कंटाळून मजुराने आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली आहे. बोदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप बन्सी तायडे (५८) असे मयत मजुराचे नाव आहे. शहरातील भीमनगर परिसरात राहणारे व बांधकाम मजुरीचे काम करणारे दिलीप तायडे यांना काही महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा आघात झाला होता. औषधांचा खर्च व घरची परिस्थिती बेताची असल्याने ते चिंतेत होते.
शनिवारी सकाळी त्यांची पत्नी शेतात कामाला गेली असताना त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. आई दारात बसलेली होती. हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दिलीप तायडे यांना रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. बोदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









