मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना महामारीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून विविध चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि अन्य लोकांवर बरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का? याची चाचपणी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना सांगितले आहे. आज इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली.

यावेळी रेड झोन्स मधील शहरे वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळे उपलब्ध होतील का तसेच चित्रीकरणाबाबत आराखडा लगेच सादर केल्यास शासन त्यावर निर्णय घेईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कॉन्फरन्समध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे डी मजिठीया, नितीन वैद्य, एकता कपूर, पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असले तरी चिंतेचे कारण नाही. शासन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळे व पुरेशी काळजी घेतल्याने आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या आटोक्यात आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि त्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्री घराघरात पोहचली आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना फटका बसला आहे. परंतु, सर्व काही थांबून राहावे या मताचा मी नाही. आपण यापूर्वीच रेड झोन वगळून इतरत्र मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरु केले आहे. आता आपण झोनपेक्षा कंटेनमेंट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांचीही व्याप्ती कमी केली आहे.
आपण कालच मराठी निर्माते, कलाकार यांच्यासमवेत विस्तृत चर्चा केली असून त्यांच्याही मागणीप्रमाणे पोस्ट प्रॉडक्शनची कामे किंवा शहरांबाहेर मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करता येईल का याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनने सध्याच्या परिस्थितीत चित्रिकरणाबाबत आपण सावधानता बाळगून काय करू शकतो याचा आराखडा द्यावा, तो सांस्कृतिक कार्य विभागाकडून तपासून त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. टीव्ही उद्योग हा मनोरंजन क्षेत्राचा फार मोठा भाग असून अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. हा उद्योग इथे स्थिरावला आहे आणि तो राज्यातच अधिक मजबूत व्हावा म्हणून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.







