नाशिक ;- नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत 21 मे 2020 पर्यंत 48 हजार 280 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना 62 हजार 854 मे.टन अन्नधान्य वितरीत करण्यात आले होते. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 55 हजार 980 मे.टन मोफत तांदूळ वितरीत करण्यात आले होते.
मे महिन्यात विभागासाठी एकूण 70 हजार 863 मे.टन अन्नधान्य मंजूर करण्यात आले असून त्यात गहू, तांदूळ, साखर आणि डाळीचा समावेश आहे. अत्यंत कमी किमतीत हे धान्य अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्याने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब याजनेअंतर्गत प्रत्येकी 71 टक्के, अहमदनगर 77 टक्के, जळगाव 66 टक्के, धुळे 80 टक्के आणि नंदुरबार जिल्ह्याने 84 टक्के अन्नधान्याचे वाटप केले आहे. एकूण 8 हजार 375 स्वस्त धान्य दुकानांवर (98.77 टक्के) धान्य पोहोचविण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात 24 लाख 12 हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रयत्न केल्याने केशरी कार्डधारकांनादेखील मे महिन्यापासून कमी किमतीत धान्य उपलब्ध करून देण्यात येत असून नाशिक जिल्ह्याने 2683 मे.टन, अहमदनगर 3285, जळगाव 2771, धुळे 1690 आणि नंदुरबार जिल्ह्यात 532 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. कार्ड ऑनलाईन न झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्नदेखील शासनस्तरावर करण्यात येत आहे.
लाभार्थ्याने नियमित अन्नधान्य खरेदी केल्यानंतर त्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्याला 5 किलो तांदूळ याप्रमाणे तांदळाचे मोफत वाटप करण्यात येते. त्यासाठी 67 हजार 745 मे.टन तांदळाचे नियतन मंजूर असून 6464 मे.टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.
नवसंजीवनी योजनेअंतर्गत संपर्क तुटणाऱ्या गावात जून ते ऑगस्ट महिन्याचे धान्य पोहोचविले जाते. यात जळगाव मधील 4, धुळे 1 आणि नंदुरबारमधील 57 गावांचा समावेश आहे. त्यापैकी 57 गावात दुकाने असून 3795 क्विंटल गहू आणि 7281 क्विंटल तांदूळ या महिन्याच्या अखेरपर्यंत धान्य पोहोच करण्यात येणार आहे.
—–