तीन दाम्पत्याचा मृतांत समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : आज शुक्रवारी सकाळी नेपाळ देशात देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस नदीत कोसळली. झालेल्या भीषण अपघातात हाती आलेल्या वृत्तानुसार, भुसावळ, जळगाव तालुक्यातील २४ जण मृत्युमुखी पडले असल्याची प्राथमिक माहिती यादीसह हाती लागली आहे. तर १५ जखमी, ४ बेपत्ता आहेत. मृतांच्या आकड्याबाबत प्रशासनाकडून अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.
बस दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. याबाबतची एक यादी “केसरीराज” च्या हाती आली आहे. या यादीच्या वृत्तानुसार, अनंत ओंकार इंगळे (५८), सीमा आनंद इंगळे (वय ४९), रेखा प्रकाश (वय ५९), हेमराज राजाराम सरोदे (वय ५६), रूपाली हेमराज सरोदे (वय ५०), भारती पाटील (वय ५२), शारदा सुनील पाटील (वय ३८), कुमुदिनी रवींद्र जावळे (वय ६२), ज्ञानेश्वर नामदेव बोंडे (वय ६०), आशा ज्ञानेश्वर बोंडे (वय ४५), आशा पांडुरंग पाटील (वय ६३), सुनील जगन्नाथ बोंडे (वय ५२), वर्षा पंकज बोंडे (वय ३९), प्रवीण पांडुरंग पाटील (वय ५२), अविनाश भागवत पाटील (वय ५१) हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर चार भाविक बेपत्ता झालेले आहे.
घटनास्थळी नेपाळ येथे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अतुल झांबरे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील समाजबांधव हे रवाना झाले आहे. दरम्यान, मंत्री तथा खा. रक्षा खडसे यांना संपर्क केला असता त्यांनी “केसरीराज” शी बोलताना सांगितले की, मी विमान प्रवासात आहे. सकाळी ११ वाजता पोहोचेल. तेव्हा मृत व जखमी याबाबत माहिती मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या. मात्र २४ जण मृत्युमुखी पडल्याबाबत त्यांनी दुजोरा दिला नाही.
ज्या बसचा अपघात घडला ती गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची (क्र. युपी ५३ एफटी ७६२३) होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे विष्णू शंकर केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
विष्णू केसरवानी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील भुसावळ येथील पार्टीने २ मोठ्या बस व १ टेम्पो ट्रॅव्हलर आरक्षित केल्या होत्या. त्यांना अलाहाबाद येथून आमच्या बस चालकांनी वाहनात बसविले होते. तेथून चित्रकूट, अयोध्या, गोरखपूर, सुनौदी, लुम्बनी येथे भेटी देऊन पोखरा येथे गेले होते. पोखरा येथून सकाळी बस काठमांडू कडे निघाली असताना ११ वाजेच्या सुमारास बस घसरल्याने दरीत व नदीत कोसळली. बसचालक मुस्तफा याचा फोन बंद येत असल्याने काही माहिती मिळू शकलेली नाही.