पाचोरा तालुक्यातील भोकरी येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात सांडपाणी अंगणात आल्याच्या क्षुल्लक कारणावरुन दोन कुटुंबात शाब्दिक चकमक होऊन या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोन तरुण जबर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली आहे.
तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात शनिवारी दि. १७ रोजी सकाळी साडेआठ ते ९ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात सांडपाणी आल्याच्या कारणावरुन समोसमोर रहात असलेल्या शेजाऱ्यांचे भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अश्फाक अमिन काकर, अफरोज अमिन काकर, रियानाबी अमिन काकर, शहीनबी अश्फाक काकर, नाजिया फिरोज काकर यांनी अचानकपणे हल्ला चढविला. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन कय्युम काकर (वय वर्षे ३४) याच्या मानेवर रियानाबी अमिन काकर या महिलेने धारदार सुऱ्याने वार केला. तसेच असलम कय्युम काकर (वय वर्षे २८) या बीएसएफला जवान असलेल्या तरुणावर अश्फाक काकर याने लोखंडी रॉडने डोक्यात जोरदार वार झाल्याने हे जबर जखमी झाले.
तर कय्युम अब्दुल्ला जनाब यांना मुकामार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. जखमींना प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी जळगाव रवाना केले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक अमोल पवार, अमोल पाटील, अभिजित निकम, मुकेश लोकरे हे पुढील तपास करत असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.