आ. राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन ; लेझीम पथक, ढोलताशा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सादरीकरण
जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कौशल्याला आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. देशाचा व राज्याचा सांस्कृतिक वारसा टिकून राहिला पाहिजे. त्यातूनच पुढील पिढी आपली अधिक संस्कारी, सक्षम बनेल. याच महत्त्वाच्या उद्देशाने आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये कलाकारांनी इच्छुकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे प्रतिपादन शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
जळगाव शहरात पहिल्यांदाच आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन लोकप्रिय आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने महोत्सवाचा पहिला भाग म्हणून रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ढोल ताशा व लेझीम पथक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते ढोलताशा व वाद्यांचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विचार मंचावर संगीत शिक्षक संजय बडगुजर, कथ्थक नृत्य विशारद अपर्णा भट कासार, डॉ. नरेंद्र चौधरी, व्यावसायिक विनोद बडगुजर, प्रा. चित्रा चौधरी, कलाकार मोहन अंभोरे उपस्थित होते. प्रसंगी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, स्पर्धेत सहभागी संघांना शुभेच्छा देतो. विजय संघासह सहभागी संघांचे योगदान महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना साहित्यासाठी शासकीय मदत हवी असेल तर त्यासाठी नक्कीच त्यांना मदत केली जाईल. यासह पुढील चार दिवसीय महोत्सवामध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असेही आ. राजूमामा भोळे म्हणाले.
यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. लेझीम स्पर्धेत ७ संघ तर ढोलताशा स्पर्धेत ६ संघांनी सहभाग नोंदविला. लेझीम स्पर्धेचे परीक्षण संजय क्षीरसागर, शरद भालेराव, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. ढोल ताशा स्पर्धेचे परीक्षण सारंग जेऊरकर, प्रा. मंजुषा भिडे, अंजली पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. तर आभार दीपक परदेशी यांनी मानले.
स्पर्धेतील क्षणचित्रे
* चिमुरडी प्राची लोहार हिची भारतमातेची वेशभूषा ठरली लक्षवेधी
* नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाच्या दिलेल्या प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने मैदान दणाणले
* स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कलाकारांचा मोठा उत्साह
* स्पर्धेत पाल्याचे सादरीकरण पाहण्यासाठी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती