जळगावात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) : बँकेत कामाला असल्याचे सांगून एका संशयिताने बांधकाम व्यावसायिकाचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरू करून परस्पर १ लाख १३७ रुपये काढून घेतले. मात्र पोलिसात तक्रार देण्याविषयी सांगताच या तरुणाने ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावर जमा केले. उर्वरित रक्कम जमा न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्यानंतर शुक्रवारी दि. ९ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल राजू पाटील (२१, रा. चंदू अण्णानगर, जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बांधकाम व्यावसायिक विनोद हंसराज बडगुजर (४८, रा. इंद्रप्रस्थनगर) यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या क्रेडिट कार्डचा वापर दोन महिन्यांपासून न केल्यामुळे ते कार्ड बंद पडले. कार्ड देणारा कपिल राजू पाटील (३१, रा. चंदू अण्णानगर) हा ४ ऑगस्ट रोजी बडगुजर यांच्या घरी गेला व त्याने तुमचे बंद पडलेले कार्ड जमा करण्यासाठी आल्याचे सांगून ते कार्ड घेतले. दिनांक ८ ऑगस्ट रोजी बँकेतून बडगुजर यांना फोन आला व क्रेडिट कार्डद्वारे एक लाख १३७ रुपये खर्च केल्याचे समजले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बडगुजर हे पोलिस ठाण्यात पोहचले. त्यावेळी पाटील याने चौकशीत ९७ हजार रुपये क्रेडिट कार्डवर जमा केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र अजूनही तीन हजार १३७ रुपये जमा केले नाहीत. बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कपिल पाटीलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. रवींद्र सोनार करीत आहेत.