जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बिघडलेल्या वैद्यकीय व्यवस्थेचा आरोप करुन, बारा बलुतेदारांच्या मदतीसाठी भाजपने आज आंदोलन पुकारलं. ठाकरे सरकारविरोधात भाजपाने ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला होताच . मात्र नाराज एकनाथराव खडसे या आंदोलनात सहभागी होतील कि नाही ? याबाबत जिल्हावासियांसह राज्याचे लक्ष लागून राहिले होते . अखेर माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगरातील निवास्थानी घोषणाबाजी करून या चर्चेला विराम दिला आहे.
सध्या एकीकडे राज्यातील भाजपचे नेते राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले. भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारविरोधात एल्गार पुकारला असताना, तिकडे नाराज नेते एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते . एकनाथराव खडसे रणांगणात उतरणार की नाही याची उत्सुकता सर्वांपेक्षा भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनाच होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आणि आपण भाजपाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले .
एकनाथराव खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगरातील कोथळी गावातील घरासमोर आंदोलन केलं. मोजके कार्यकर्ते आणि सोबत खासदार रक्षा खडसे यांनीही यावेळी या आंदोलनात सहभाग घेतला. ‘उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उद्धव सरकार मात्र आपल्या घरात, कोरोना रोखण्यात पूर्ण निष्फळ उद्धव सरकारचा धिक्कार, कोरोनाचे संकट होतंय फारच गडद, गोरगरिबाला सोडले वाऱ्यावर, असे काही फलक घेऊन एकनाथराव खडसे आणि कार्यकर्ते अंगणात उभे होते.