जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : वाळूची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडून ते तहसील कार्यालयात घेवून जात होते. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने रस्ता अडवून तलाठी व शिपाई यांना धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कारवाईसाठी घेवून जात असलेले ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील लाकुडपेठ परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विना क्रमांकाचे रेतीने भरलेले ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ थांबवले. ट्रॅक्टर चालकाकडे परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. तलाठी यांनी लागलीच याबाबतची माहिती तहसीलदार यांना दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इकबाल शेख यांना मदतीसाठी पाठविले. त्यानंतर शिपाई इकबाल शेख हे रेतीच्या ट्रॅक्टरवर बसवून ट्रॅक्टर कारवाईसाठी तहसील कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले.
ट्रॅक्टर चालकाने तलाठी यांच्या वाहनाला ओव्हरटेक करीत ट्रॅक्टर लाकूडपेठच्या दिशेने पळवून नेला. तलाठी राहुल अहिरे व शासकीय वाहन चालक हे ट्रॅक्टरचा पाठलाग करीत असतांना एक इसम त्यांच्या वाहनाला आडवा झाला. यावेळी त्या इसमाने वाहन चालक मनोज कोळी यांच्यासोबत झटापट केली आणि ट्रॅक्टरवर बसलेल्या शिपाई इकबाल शेख यांना धक्काबुक्की करीत ट्रॅक्टवरुन खाली ओढीत ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.