उपचारादरम्यान मृत्यू, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : विविध फायनान्स संस्थांची घेतलेली कर्जे त्यातच कौटुंबिक आर्थिक अडचणी यातून नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्याने मंगळवारी दि. २३ जुलै रोजी दुपारी विषारी औषध घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गौतम श्रीराम हिरोळे (वय ३९, रा. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. त्यांनी शेतीकामासाठी विविध फायनान्स संस्थांकडून कर्ज घेतले होते.(केसीएन) ते कसे फेडता येईल या विवंचनेत त्यांनी दि. २३ जुलै रोजी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा शनिवारी दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी यावेळी एकच आक्रोश केला. (केसीएन) याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिवरावर आपत्ती कोसळली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.









