जळगाव वैद्यकीय महाविद्यालयांतर्फे जनजागृती रॅलीला प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : अवयवदान सर्वश्रेष्ठ दान असून त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे आले पाहिजे. अवयदानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी समुपदेशन करून अवयवदान व देहदानासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी केले.
भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण व संचालनालयातर्फे अवयवदान जनजागृती अभियान राज्यभरात घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेला विचार मंचावर अध्यक्षस्थानी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शर्मिली सूर्यवंशी, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश महाजन, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंकी, डॉक्टर उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयवंत नागुलकर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रास्ताविकातून डॉ. अमित भंगाळे यांनी कार्यक्रमाविषयीची भूमिका मांडली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळेला डॉ. शर्मिली सूर्यवंशी, डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. प्रशांत सोलंकी आणि डॉ. अविनाश महाजन यांनी मनोगतातून अवयवदान चळवळ वाढण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयातर्फे अधिकाधिक प्रयत्न केले जातील अशी ग्वाही या वेळेला दिली.
प्रसंगी उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना अवयवदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून डॉ. किशोर इंगोले सांगितले की, अवयवदान व देहदान महत्त्वाच्या बाबी असून सामान्य नागरिक अद्यापही याबाबत गैरसमजांमध्ये गुरफटले आहेत. अवयव दान आणि देहदान ही चळवळ वाढली पाहिजे. सामान्य नागरिकांनी यासाठी पुढे होऊन वैद्यकीय महाविद्यालयात येऊन त्याबाबतचे अर्ज भरून दिले पाहिजे असे सांगितले.
सूत्रसंचालन करून आभार अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मांडले. या वेळेला विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.