जळगांव-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरत असल्याने,राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच कोरोना संदर्भात कडक व सक्षम उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी आज जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव अॅड.शहेबाज शेख यांच्या सोबत महानगर पदाधिकारी मोहम्मद नूर शेख, गुड्डू पठाण,फिरोज खान,सैय्यद अख्तर,अजहर सैय्यद,आरीफ खान हे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि , कोरोना संसर्ग रोखण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी व निष्क्रिय ठरत असून देशात रुग्णांच्या संख्येत नंबर एक वर महाराष्ट्र पोहचलेला आहे. रुग्णसेवेत अनेक उपाययोजनांची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशात सर्वाधिक मृत्यूदर हा महाराष्ट्रात असून, केंद्राने दिलेले निर्देश न पाळता त्या संदर्भात ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांचा पुढचं पाऊल उचलण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णतः असक्षम ठरले आहे. मग पीपीई किट असतील, हॉस्पिटलची निर्मिती असेल, राज्यातील सर्व क्षेत्रातल्या लोकांना एकत्र करून एक चांगलं नेतृत्व देऊन कोरोना विरोधात लढण्याकरिता बळ देणे असेल अशा सर्वच बाबतीत राज्य सरकारचे नेतृत्व हे मोठ्या प्रमाणावर अपयशी झालेले आहे.
दुर्दैवाने सगळं जग, देश कोरोना विरोधात संघर्ष करत असताना महाराष्ट्रात मात्र हे महाआघाडीचे सरकार राजकारण करण्यात सातत्याने मग्न आहे.राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण केली जात असून,महाविकास आघाडी सरकारतर्फे फक्त केंद्र सरकार विरुध्द राजकारण केले जात आहे.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकार व देशातील अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यासाठी अजूनही पॅकेज जाहीर केलेलं नाही.
केंद्राने दिलेली मदत सुद्धा जनतेपर्यंत पोचवण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. गरजू व राशन कार्ड धारकांना या मदतीचा लाभ होत नसून केंद्रातर्फे देण्यात आलेल्या धान्याचा काळाबाजार होत असून,त्या मोबदल्यात अवास्तव किमती आकारल्या जात आहे.
शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारचे धोरण अत्यंत उदासीन असून फक्त पोकळ घोषणा करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात कसल्याही योजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना चणा, मका व कापूस विक्रीसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जळगांव जिल्हा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे सदर आशयाचे निवेदन देण्यात आले असून,राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचा यावेळी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.







