अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : बाहेरगावी असलेल्या तिन्ही भावांची बंद घरे फोडून सुमारे ६० हजारांचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दिनांक १५ जून ते २८ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान तालुक्यातील मुंगसे येथे घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील मुंगसे येथील चंद्रकांत अर्जुन पाटील, ज्ञानेश्वर अर्जुन पाटील, रवींद्र अर्जुन पाटील या तिघा भावांची घरे शेजारी शेजारी असून तिन्ही पुणे, वापी व नाशिक येथे वास्तव्यास आहेत. दिनांक १५ जून रोजी त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर तिन्ही घरांना कुलूप लावून गेला होता. मात्र दिनांक २८ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता सरपंच नीलेश कोळी याने चंद्रकांत पाटील यांना त्यांची तिन्ही घरे फोडल्याचे कळवले.
तिघे भाऊ घरी मुंगसे येथे आले असता त्यांना घरचे कडीकोयंडे तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त टाकल्याचे दिसून आले. चंद्रकांत पाटील यांच्या घरातून ४० हजार रुपयांची २० ग्रॅम सोन्याची चेन, १० हजार रुपयांची ५ ग्रॅम अंगठी, ५ हजार रुपये रोख, ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरातून ६०० रुपयांच्या पितळी वस्तू तर रवींद्र पाटील यांच्या घरातून २५०० रुपये रोख, ५०० रुपयांची अडीच भार चांदी व ६०० रुपयांची तांब्यापितळेची भांडी असा एकूण ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे. कॉ. विजय भोई करीत आहेत.