यंदा वाढणार कापूस पिकाचा पेरा
चंद्रकांत कोळी
रावेर (विशेष वार्तापत्र) : संपूर्ण रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने खरिपाच्या पिकांची स्थिती अति उत्तम असून सर्वच पिके डोलु लागली आहेत. तालुक्यात गत वर्षाच्या तुलनेने या वर्षी कापुस पिकाचा पेरा वाढला असल्याचे सांगितले जात आहे.
मागील वर्षी भाव कमी मिळाला होता. तरी सुद्धा भविष्यात काहीतरी पदरात पाडून फायदा होईल या आशेने शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. त्याच बरोबर मक्का या पिकाचा पेराही वाढला आहे. नगदी पीक म्हणून या पिकाची लागवड करताना सर्वांत जास्त शेतकरी दिसतात. खरिप आणि रब्बी या दोन्ही प्रकारात मक्का या भागात घेतला जातो. प्रती एकरी ४० ते ४५ क्विंटलप्रमाणे काही शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतल्याचे दिसून आले आहेत.
त्यामुळे या भागात मक्याचा पेरा वाढला असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा मोठया प्रमाणात सुटला जातो. कडधान्य त्या मानाने रावेर तालुक्यातील पहाडी भागातच घेतले जातात. प्रामुख्याने पाल, मोरव्हाल, लाल माती, जिन्सी, तिळ्या निमड्या, मोह मांडली तसेच मध्य प्रदेशाच्या सिमेलगत असलेल्या आदिवासी गावातच ही पिके घेतली जातात. कारण त्या भागातील जमिन खडकाळ व लाल मातीचा असल्याकारणाने ही पिके या जमिनिवर चांगल्या प्रकारे येत असल्याचे शेतकरी सांगतात. उडीद, मूग, मठ, चवळी, वाल इत्यादि कडधान्यांचा पेर पहाडी आणि आदिवासी भागात घेतला जातो.
केळी लागवड अगदीच नगण्य प्रमाण असते. तालुक्यात १२० गावे आहेत. त्यात २४ गावे ही पुर्ण आदिवासी आहेत. रावेर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ९५. ७०० हेक्टर एवढे असून त्यातील २४०० हेक्टर क्षेत्रावर वनविभाग आहे. बाकी जमिन महसूल विभाग कार्यरत आहे. तिन प्रमुख नद्या आहेत. त्यात सुकी, भोकर, फारशा या उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या वाहतात. त्या तापी नदीला मिळतात. तालुक्यात ४ प्रमुख धरणे आहेत. आभोरा, मंगरूळ, गंगापुरी, लालमाती आणि तिन तालुक्यातील प्रमुख असलेले हतनुर या धरणाचा फायदा ही तापी नदीच्या काठावर वसलेल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी वापर होतो. यातील सर्वच धरणे भरली असल्याने सर्वत्र पाण्याची समस्या सुटल्याने आनंद व्यक्त केला जात असून खरिपाची पिके डोलु लागली आहेत.