पारोळा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापूर येथे बसेस नियमित येत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दिनांक २६ जुलै रोजी दुपारी धरणगाव रस्त्यावर रास्ता रोको केला. तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ वाहतूक बंद होती. पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी तारांबळ उडाली.
पारोळा तालुक्यातील हिरापूर येथे बससेवा नेहमी बंद केली जाते. शुक्रवारी सकाळी दहाची बस आलीच नव्हती. बसचे वेळापत्रक अनियमित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होते. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळा महामंडळाकडे तक्रार केली होती. शुक्रवारी सकाळी बस आली नव्हती. त्यामुळे हिरापूर गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या पारोळा धरणगाव रस्त्यावर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिरापूर फाट्याजवळ विद्यार्थी-विद्यार्थिनी व गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी ५० ते ६० विद्यार्थी उपस्थित होते. त्यात गावातील नागरिक सहभागी झाले.
तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको केल्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुनील पवार पोहोचले. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांना बस बाबत प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको थांबविण्यात आला. सकाळी दहा वाजता हिरापूर बसमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे ही बस पुढे जाऊ शकली नसल्याची माहिती मिळाली.