पुणे (वृत्तसंस्था) – करोनामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या काळात शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे 483 व्यक्ती विविध शहरांतून व दूर गावांवरून आलेल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा व्यक्तींना ते राहात असलेल्या घरात किंवा शाळांमध्ये स्थानिक प्रशासनाने क्वारंटाइन केले आहे.

याबाबतची माहिती तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी दिली. विशेष म्हणजे शिरूरच्या पूर्व भागातील 23पैकी मोठ्या गावांमध्ये बाहेर गावांवरून आलेल्या स्थानिकांबरोबरच आयात झालेल्या पै-पाहुण्यांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण आहे. कारण, तालुक्यात सापडलेले अनेक रुग्ण हे बाहेरूनच आलेले आहेत.
तसेच स्थानिक प्रशासनाने बाहेरगावावरून येणाऱ्या स्थानिक नागरिकांना गावात घेण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यांनी क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. पै-पाहुण्यांनी त्यांच्या मूळगावी जावे असा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. असे असताना अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी व आशा वर्कर्स बाहेरून आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्यासाठी गेले असता, त्यांना अनेकदा स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते. कधी ग्रामस्थांकडून त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते.
अशा वेळी संबंधित ग्रामस्थांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक प्रशासन व आशा वर्कर्स यांच्याकडून होत आहे. त्याचप्रमाणे शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेक ठिकाणी दुचाकीवर मास्कचा वापर न करताना फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांना पोलिसी खाक्या दाखवून कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.
गावनिहाय क्वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्ती :
1) न्हावरे – 100
2) मांडवगण फराटा – 91
3) वडगाव रासाई – 56
4) शिरसगाव काटा – 44
5) रांजणगाव सांडस – 31
6) पिंपळसुटी- 32
7) उरळगाव – 26
8) निर्वी – 15
9) कुरुळी – 13
10) नागरगाव – 11
11) निमोणे – 10
12) आलेगाव पागा – 9
13) इनामगाव – 9
14) कर्डे – 7
15) चव्हाणवाडी – 6
16) चिंचणी – 5
17) गणेगाव दुमाला – 5
18) आंबळे – 4
19) आंधळगाव – 4
20) गुनाट – 4
21) तांदळी – 1
22) शिंदोडी – 0
23) कोळगाव डोळस – 0







