नवी दिल्ली ;- जगातील १५ देशांना करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. या १५ देशांमधील करोना रुग्णांची एकत्रित संख्या भारतापेक्षा ३४ पटीने जास्त आणि मृत्यूचे प्रमाण ८३ पटीने अधिक आहे. या १५ देशांची लोकसंख्या एकत्र केली तर ती भारताच्या लोकसंख्येएवढी आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. त्या तुलनेत भारतात करोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.जागतिक सरासरी काढली तर एकलाख लोकसंख्येमागे ६२ करोनाचे रुग्ण आहेत. तेच भारतात एक लाख लोकसंख्येमागे आठ करोना रुग्ण आहेत. भारताने करोना टेस्टचा वेगही वाढवला आहे. भारताने सलग दुसऱ्या दिवशी एक लाख करोना चाचण्या केल्या.मागील चोवीस तासांत देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले 63 हजार 624 रुग्ण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 435 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे. ४२ हजारपेक्षा जास्त नागरिक करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.








