नशिराबाद येथे फर्निचर दुकानात घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर येथे भवानीपेठेत कर्मचाऱ्यांना बांधून लाखोंचा दरोडा पडला होता. त्यानंतर आता तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव रस्त्यावरील जय हिंद फर्नीचर कंपनीत मध्यरात्री दोन कर्मचाऱ्यांना टॉवेलने बांधून दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादी आदी साहित्य असा एकुण ४ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी दि. २० जुलै रोजी मध्यरात्री १.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद ते सुनसगाव रस्त्यावर मनोज पंढरीनाथ पाटील (वय ४५ रा मोहाडी रोड, जळगाव) यांचे जय हिंद फर्निचर दुकान आहे. शनिवारी दि. २० जुलै रोजी मध्यरात्री त्यांचे दुकानातील कर्मचारी जितेंद्र कुमार राम नरेश कुमार (वय २८) आणि पिंटू कुमार शिवचंद्रराम (वय २६ दोन्ही रा. उत्तरप्रदेश) हे दोघेजण दुकानाच्या आत झोपलेले होते. त्यावेळेला अज्ञात चार ते पाच जणांनी दुकानात घुसून कर्मचाऱ्यांना टॉवलने बांधले.
त्यानंतर दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह ४ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालक मनोज पाटील यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करणे सुरु केले आहे. तसेच, चोरट्यांनी सर्व भागात माहिती घेतली जात आहे. पुढील तपास सपोनि रामेश्वर मोताळे हे करीत आहे.