शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जुना सावदा रस्त्यावरील नागझिरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम सुरु झालेले आहे. पुलाचे काम सुरु असतांना परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता जवळपास नाही. नागरिकांना सोयीचा पर्यायी रस्ता तयार करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सावदा-रावेर जुना रस्त्यावरील नागझिरी नाल्यावरील पुलाचे काम सुरु झालेले आहे. काम सुरू करण्यापुर्वी ठेकेदाराने पर्यायी रस्ता बायपास वाहतुकीसाठी करणे आवश्यक असते. तशी अंदाज पत्रकात तरतूद असते. कामही संथगतीने सुरू आहे. मात्र आता नागरिकांचे हाल सुरु असून पुलाच्या पार शाळा, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वसाहत असल्याने जाण्यासाठी नागरिकांना जवळपास बायपास रस्ता सध्या नाही.
रावेर सावदा जुना रोडवर नागझिरी नाल्याजवळ पर्यायी रस्ता तात्काळ करावा, अन्यथा २६ जुलै रोजी रावेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे तहसीलदार कापसे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रावेर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील, डी.डी.वाणी, दिलीप साबळे, महेश तायडे, पुंडलिक चावदास कोळी, नितीन चौधरी आदी उपस्थित होते.