मृत्यूचे कारण अज्ञात ; चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : येथून जवळ असलेल्या कमळगाव येथील शेत शिवारात एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणाने अकस्मात मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यात आणखी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत अजून सात जणांवर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.
कमळगाव शिवारात नीलेश गोविंदा केंगे यांच्या शेतात सीताराम बारेला हे कुटुंबासह राहतात. दि.१८ जुलै रोजी रात्री सीताराम बारेला यांची मुले अंजली बारेला, रोहित बारेला यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यांचा परस्पर दफनविधी करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मुलगा बादल बारेला हाही अत्यवस्थ झाल्याने त्याला दवाखान्यात आणत असताना त्याचाही मृत्यू झाला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयात बादलचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर सीताराम बारेला यांची अवघ्या पाच महिन्याची बालिका आरती बारेला हिचीदेखील प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. ही घटना नेमकी कशामुळे झाली हे समजू शकले नाही. या घटनेत उलट्या, मळमळ, जुलाब, पोटदुखीने त्रस्त असण्याच्या तक्रारी बालकांना होत्या.
यासोबत कमळगावच्या आसपासच्या गावातील रहिवासी देखील बाधित झाल्याचे समोर आले आहे. मुकेश गणेश बारेला (८), सोनाली गणेश बारेला (१०), शिला गणेश बारेला (३०), दीपाली गणेश बारेला (१०), सुनीता गणेश बारेला (सर्व रा. कमळगाव, ता.चोपडा, १७), रेखा मुकेश बारेला (३५), मुकेश लक्ष्मण बारेला (४८) दोन्ही रा. उनपदेव, ता. चोपडा यांच्यावर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील, डॉ. कोमल गावंडे यांच्याकडून बाधितांवर शर्तीचे उपचार सुरू आहेत. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल गावंडे यांच्याशी संपर्क साधला असता, बालकांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येणार नाही, परंतु उपचारासाठी दाखल झालेल्यांची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत, असे त्यांनी सांगितले.