भुसावळ तालुक्यातील घटना, ओळख पटवण्याचे आवाहन
भुसावळ (प्रतिनिधी): भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात २० ते २२ वर्षीय तरुणाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवारी आढळल्याने शहरात खळबळ उडाली. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे ? याबाबत शवविच्छेदन अहवालाअंती सांगता येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भुसावळ तालुका पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक ३१७/१ मधील दक्षिण बांधालगत २० ते २२ वर्षीय तरुणाचा कुजलेला व नग्न अवस्थेतील मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड आदींनी धाव घेतली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.