यावल तालुक्यातील कोळवद येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळवद गावातील एका विवाहितेने मंगळवारी दि. १६ जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेतला. घटने प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगीता निलेश चौधरी (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या पश्चात पती, चार वर्षीय मुलगी व दिड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी राहत्या घरात विवाहितेने आत्महत्या केली. कुटुंबीयांना घटनेची माहिती कळताच त्यांनी तातडीने तिला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून मृत घोषीत केले. विवाहितेने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.
याप्रकरणी यावल पोलिसात डिगंबर चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार उमेश सानप, राजेंद्र पवार, मोहन तायडे करीत आहे.