पाचोरा पोलीस स्टेशनने एका दिवसात लावला तपास
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी बॅटरी, केबल व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी दि. १३ रोजी रात्री घडली असून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
सलमान शेरू पिंजारी (वय २१, रा. कुर्बान नगर, पाचोरा, ह.मु. जळगाव) यास अटक करण्यात आली. सारोळा रोडवरील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. (केसीएन)यात अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीची बॅटरी, २ हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर, ३ हजार रुपये किमतीची तांब्याची तार असा १५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. वॉचमन शरद पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, यातील संशयित आरोपी म्हणून सलमान पिंजारी यास अटक करण्यात आली. त्याने जावेद उर्फ जाबिर बबलू पिंजारी (२१, रा. कुर्बाननगर, पाचोरा) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. परंतु जावेद हा फरार झाला आहे. सलमान यास न्यायालयात हजर केले असता त्याला १ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.