एरंडोल तालुक्यातील घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : तालुक्यातील कढोली येथे शनिवारी दि. १३ जुलै रोजी मध्यरात्री २ ते ३:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गावात चार ठिकाणी घरफोडी करत एका ठिकाणी ५० हजार रुपये, तर दुसऱ्या ठिकाणी ५० हजार रुपये व ५ ग्रॅम सोन्याची अंगठी चोरून गेली. दोन घरात काहीच हाती लागले नाही. त्या घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी पलायन केले. एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू ऊर्फ अशोक मांगो बडगुजर हे आपल्या कुटुंबासह काही कामानिमित्त चोपडा येथे गेले होते. त्यांच्या घरातून कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये चोरट्यांनी काढले. त्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यानंतर शर्मिलाबाई गोकुळ कोळी यांच्या घरात चोरटे शिरले. तेथे काही हाती न लागल्याने चोरट्यांनी तिथेही सामान अस्ताव्यस्त फेकले. त्यानंतर वृद्ध दाम्पत्य राहत असलेले घर गाठत गोकुळ सोनू पढ्यार (७८) व यशोदाबाई गोकुळ पढ्यार (७२) यांच्या घरात चोरी केली. त्यांचा मुलगा रवींद्र गोकुळ पढ्यार हा एसटी महामंडळात चालक म्हणून ड्यूटीला असल्याने तो परतल्यानंतर वरच्या मजल्यावर झोपी गेला.
चोरट्यांनी खालच्या मजल्यावर घुसत चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या घरात काही सापडले नाही. त्यामुळे त्यांनी बाजूलाच राहत असलेल्या त्यांच्या वृद्ध आईवडिलांनी बचत करून डब्यात ठेवलेले ५० हजार रुपये व ५ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून नेल्याची फिर्याद एरंडोल पोलीस स्टेशनला एसटी चालक रवींद्र पढ्यार यांनी दिली आहे.